अकोला,दि.1:- एपिल महिन्यात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तीं यांची जयंती असुन 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दि. 1 एपिल ते 1 मे 2023 या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘ सामाजिक न्याय पर्व ’ हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाव्दारे राबविण्यात येत आहे. यासंदर्भात समाज कल्याण आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीमचे आयोजन करणे, राज्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय यांच्या वतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, महाविद्यालय, आश्रम शाळा, निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारावर आधारित वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करणे, तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रतिनिधिक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे. समतादुत यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटयद्वारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनर्वसन कायदा 2013 जनजागृती करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी व ओळखपत्र वाटप तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुर्नगामन शिबिर आयोजित करणे ,त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव.
ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे. नवउद्योजकांसाठी उद्योजकता शिबिर आयोजित करणे. समान संधी केंद्रा मार्फत नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांची माहिती जनजागृती करणे. तृतीयपंथी व्यक्तींसाठी शिबिर आयोजित करणे व ओळखपत्र वाटप करणे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे. शासकीय वसतिगृह, निवासशाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधने. महाराष्ट्र दिन साजरा करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे. दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याचा अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.