अकोला दि. 1 :- तृणधान्य पिकांचे लागवड क्षेत्र व उत्पादन वाढ करणे तसेच त्यांचे आहारातील महत्व व फायदे यांची जनजागृती व्हावी याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालय ते मुर्तिजापूर रोड-डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ मार्गे चित्ररथ व दुचाकी रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष’ म्हणुन घोषित केले असून जिल्ह्यात जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज कृषि विभाग व आत्माच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज सकाळी आठ वा. चित्ररथ व दुचाकी रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा प्रशासन, कृषि विभाग व आत्माचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कांतप्पा खोत, जिल्हा कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी व कृषि सेवक आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होवून वाटीका चौक, मुर्तिजापूर रोड मार्ग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. चित्ररथावर पौष्टीक तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा व राजगीरा या तृणधान्याचे आहारातील महत्व व त्याचे फायदे याबाबत बॅनरव्दारे माहिती देण्यात आली. तर दुचाकी रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.