जलयुक्त शिवार अभियान २;
गावांतील जलसंधारण कामांचे नियोजन करा: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश
अकोला, दि. 10 :- शासनाव्दारे जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्याचे निर्णय घेतला आहे. त्याअुषंगाने जलयुक्त शिवार अभियानातर्गंत ग्राम व तालुकास्तरावर शासनाच्या निर्देशानुसार समिती स्थापन करावी. तसेच ज्या गावाचा अभियानात समावेश करायचा आहे, अशा गावांचा जलसंधारण कामांचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, प्र. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अभयसिंह मोहिते, रामेश्वर पुरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, मुख्यधिकारी, तहसिलदार आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, जलयुक्त शिवार अभियानात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे गावाची निवड करुन त्याचे सुक्ष्म नियोजन करावे. ग्रामस्तरावर समिती स्थापन याकरीता उपविभागीय अधिकारी सहकार्य करावे. आराखडा तयार करताना कालमर्यादेचे पालन करावे. तसेच अभियानाची अंमलबजावणीसाठी कृषि विभाग व जलसंधारण विभागाने संबधित विभागांशी समन्वय साधावे.
जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते यांनी प्रास्ताविकेत जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली. यामध्ये निकषांचा आधारे गावांची निवड, पाण्याचा ताळेबंद, गाव आराखडा, अभियानातर्गंत घेण्यात येणारी कामे, कामाचा प्राधान्यक्रम व त्याअनुषंगाने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता इ.बाबत माहिती दिली.