अकोला,दि. ७ :- मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. साहित्य, लोककला, गीत-काव्य यातूनही मराठी आपलं भावविश्व समृद्ध करत जाते. प्रशासनातही मराठीचा परिपूर्ण वापर केला जातो. ही भाषा इथल्या शौर्य, पराक्रम आणि समाजसुधारणांची आहे, त्यामुळे सगळ्यांनी अभिमानाने मराठी बोला, वाचा आणि लिहा, असा संदेश सर्व मान्यवर वक्त्यांनी आजच्या मराठी भाषा संवर्धन कार्यशाळेनिमित्त दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आज ‘मराठी भाषा संवर्धन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे हे होते. तर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, विदर्भ साहित्य संघाचे डॉ.गजानन नारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी यावेळी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात अपर जिल्हाधिकारी घुगे म्हणाले, मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. विविध बोलींचा समावेश असलेली ही भाषा समृद्ध आहे. कथा,कादंबरी,काव्य अशा विविध साहित्य प्रकारांनी ही भाषा अधिक व्यापक बनली आहे. या भाषेच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. महाराष्ट्र शासनानेही राज्य आणि जिल्हा मराठी समित्यांची स्थापना करून यादिशेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शासनाच्या या उपक्रमांसह प्रत्येकानेच मराठी भाषेच्या प्रचार -प्रसारात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सदाशिव शेलार यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेच्या इतिहासासह मराठी भाषेच्या १९६४ आणि २०२१च्या अधिनियमांविषयी माहिती दिली. मराठी भाषेत लिहिलेले गेलेले पहिले मराठी वाक्य आणि पुढे मराठी भाषेत सुरु झालेल्या लेखन प्रपंचावरही त्यांनी प्रकाश टाकला. सातवाहन काळात महाराष्ट्रात सुरु झालेला मराठी भाषेच्या प्रशासकीय वापराबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली.
डॉ.गजानन नारे यांनी मराठी भाषेला येत्याकाळात अभिजात भाषेचा दर्जा मिळून या भाषेला वैभव प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला. मराठी काव्याच्या विविध प्रकारांवर त्यांनी प्रकाश टाकला. मराठी भाषेतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाचन होण्यासाठी शाळांमधून ग्रंथालय चळवळ सुरु होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मिलिंद दुसाने यांनी मराठी भाषा ही नवमाध्यमांमधूनही वापरली जावी, तरुणाईने त्यासाठी मराठी ही समाजमाध्यमांवरही समृद्ध करावी. प्रमाणभाषा ही सर्वांना आकलन व्हावे यासाठी असते, त्यादृष्टीने त्याकडे बघणे आवश्यक आहे, असे विचार यावेळी मांडले.
संजय खडसे यांनी दैनंदिन आयुष्यात समाजमाध्यमांवरील मराठी भाषेच्या सहज वापराबाबत मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही आपली मायबोली असून आपल्या भावभावना ह्या त्यातून अधिक समर्पकपणे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळेच मराठी भाषिक असल्याचा अभिमान आपण प्रत्येकाने बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
किशोर बळी यांनी ‘मैफल’ तर विशाल बोरे यांनी ‘गाजले या धर्तीवर शिवाजी युगंधर’, या कवितेचे सादरीकरण केले. या कार्यशाळेत अकोला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी – विद्यार्थीनी, शिक्षक व शासकीय अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले. किशोर बळी यांनी सूत्र संचलन तर जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांनी आभार मानले.