अकोला,दि. 30 :- विज्ञान शाखेच्या ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थांना जात वैधता उपक्रम, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रक्रियेची माहिती होण्यासाठी आज अकोट येथील श्री. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर संविधान दिन आणि ६ डिसेंबर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिना दरम्यान राज्यात समता पर्व साजरे होत आहे. या पर्वाचा एक भाग म्हणून समाज कल्याण आयुक्तालय,पुणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या निर्देशानुसार तसेच अकोला येथील संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना ‘मंडणगड पॅटर्न’ नुसार जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अकोला जिल्ह्यात तालुकास्तरीय जात वैधता प्रमाणपत्र माहिती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत अकोट येथे या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
प्राचार्य संजय वालसिंगे या शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या शुभांगी कोरडे (पोलीस निरीक्षक), श्री.निखाडे (कनिष्ठ लिपिक), विजय पी. बेदरकर (जिल्हा प्रकल्प अधिकारी, अकोला बार्टी,पुणे) यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जातवैधता प्रमाणपत्र अर्ज प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचीही उत्तरे यावेळी देण्यात आली. प्राचार्य वालसिंगे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला कार्यालयाने आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाबाबत सामाजिक न्याय विभाग व अकोला सीव्हीसी कार्यालयाचे आभार मानले. समता पर्व – २०२२ अनुषंगाने यावेळी उपस्थित मान्यवरांना बार्टी प्रकाशन विभागाची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. बार्टी प्रकल्प अधिकारी व्ही.पी.बेदरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या योजना व बार्टी उपक्रमाच्या घडीपत्रिका वितरीत केल्या.
Top Bollywood Celebrities With Expensive Cars