अकोला,दि 15 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने जागतिक बालहक्क सुरक्षा सप्ताहांतर्गत बालहक्कांविषयी जागृतीकरण्यासाठी सज्ज झालेल्या व्हॅनला आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी बालहक्क जागृतीविषयक भित्तीपत्रावर स्वाक्षऱ्या करून स्वाक्षरी मोहिमेचाही शुभारंभ केला.
![जनजागृती व्हॅन](https://ourakola.com/wp-content/uploads/2022/11/जनजागृती-व्हॅन-1-scaled.jpg)
जागतिक बालहक्क सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बालकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी दि.१४ ते २० नोव्हेंबर दरम्यान सचित्र व्हॅन जिल्ह्यात फिरणार आहे. वयोगट ० ते १८ वर्षाआतील मुलांच्या काळजी व संरक्षणाकरिता चाईल्ड लाईन व रेल्वे हेल्पलाईन १०९८ क्रमांकासह अन्य उपयुक्त माहिती या व्हॅनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच, अकोला शहारातील रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि टॉवर चौकात पथनाटयाद्वारे बालहक्क विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.