अकोला,दि.१० :- कोविड -१९ मुळे पालक गमावलेल्या बालकांना ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत देण्यात येणारी मदत तसेच कोविड मुळे घरातील कर्ता पुरुषाचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.
या बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात कोविडमुळे पतिचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिलांची संख्या ६९० असून या महिलांना प्राधान्याने अस्तित्वात असलेल्या शिधापत्रिका, जन्म मृत्यू दाखला, वारस प्रमाण पत्र, मालमत्ता विषयक हक्क या सेवा तसेच संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, कुटुंब निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी आवश्यक असणाऱ्या व पात्रतेनिहाय लाभ द्यावयाचा आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या दोन बालिकांना शासनाकडून प्राप्त पाच लाख रुपये मदत निधीचे प्रमाणपत्र देण्यात आले.