अकोला,दि.29 :- जिल्हाधिकारी यांना अभ्यागत व शेतकऱ्यांनी भेटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.यानुसार कामकाजी दिवसांमध्ये दररोज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान अभ्यागतांना भेटण्याची तर शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत भेटण्याची वेळ आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात आली आहे. अभ्यागत व शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेल्या वेळेतच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
आता सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान अभ्यागतांना भेटता येणार आहे. तर, शेतकऱ्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर सोमवारी सकाळी १०.३० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, सामान्य नागरिकांचे निवेदन, अडचणी व समस्यांचे निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 4 ते 5 वाजे दरम्यानची वेळ निश्चित करण्यात आली होती. बदललेल्या वेळेनुसार कृषी विभागासंबधीत ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना’, ‘हवामान आधारित फळपिक विमा योजना’, ‘ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’, पिक कर्ज, सावकारी प्रकरण, बियाणे व खते मागणी, इ.बाबत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दर सोमवारी सकाळी १०.३० वाजता भेटता येईल. संबंधित तक्रारदार नागरिक, अभ्यागत आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या वेळेतच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात भेट द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे .