अकोला, दि.१: ‘लम्पी त्वचा रोग’, या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
‘लम्पी त्वचा रोगःप्रतिबंध व उपाययोजनां’बाबत सर्व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच महसूल व ग्रामविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी.एम. दळवी, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, डॉ. बाळकृष्ण धुळे,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर्व सहा. आयुक्त पशुसंवर्धन , पशुधन विकास अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. बुकतरे यांनी जिल्ह्यातील लम्पी त्वचा रोग या जनावरांमधील आजाराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती सादर केली. त्यानुसार, जिल्ह्यात २६ गावांमधील जनावरांमध्ये या आजाराने संक्रमित जनावरे आढळली आहेत. आतापावेतो ३८३ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. उपचारानंतर २९४ जनावरे बरी झाली आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत या आजाराने एकही जनावर दगावलेले नाही. उद्भव झालेल्या ठिकाणांच्या ५ किमी त्रिज्या परिसरात ९२ गावे असून या गावांमध्ये गायवर्गीय २५ हजार ९८१ तर म्हैसवर्गीय ४९९९ असे एकूण ३० हजार ९८० जनावरांची संख्या आहे. या सर्व जनावरांचे लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून आतापावेतो १७ हजार ५९६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, हा आजार संसर्गजन्य असून बाधीत व अबाधीत जनावरांचा संपर्क येऊ न देणे, गोठ्यांचे निर्जंतूकीकरण, गोचिड गोमाशांचे निर्मूलन या सारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या. त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील यंत्रणेने समन्वय राखून कामे पूर्ण करावीत. लसीकरण व उपचार राबवित असतांना अन्य जनावरांमध्ये फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. लसींचा अधिकचा साठा मिळविण्याचे नियोजन करावे. बाधीत जनावरे असलेल्या ठिकाणापासून १० किमी त्रिज्या परिसरातील गुरांचे बाजार भरविण्यात येऊ नये,असे निर्देशही त्यांनी तालुका यंत्रणेस दिले.