नवी दिल्ली – श्रीलंकेपाठोपाठ आता बलाढ्य समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये देखील आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधून समोर आलेल्या व्हिडीओवरून असा दावा करण्यात आला आहे. चीनमधील बँकिंग क्षेत्रावर मोठं संकट आल असून चीनमधील बँकांनी ग्राहकांची खाती गोठवली आहेत. याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. (china deploys tanks news in marathi)
चीनमधील परिस्थिती एवढी बिकट झाली की, सरकारला बँकांच्या बाहेर रणगाडे तैणात करावे लागले आहे. ग्राहकांना पैसे काढण्यापासून रोखण्याच्या बँकांच्या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हेनान प्रांतात गेल्या अनेक आठवड्यांपासून पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. चीनमध्ये ही परिस्थिती यावर्षी एप्रिलपासून निर्माण झाल्याचं समजतं. एप्रिलपासून बँकांनी ग्राहकांना त्यांची बचत काढण्यापासून रोखण्यास सुरुवात केली आहे.
चीनच्या बँकांबाहेर तैनात केलेल्या रणगाड्यांचे व्हिडिओ आणि तेथे उद्भवलेली परिस्थिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे रणगाडे आंदोलकांना घाबरवण्यासाठी रस्त्यावर तैनात केल्याचे दिसून येते.
हेनानमधील बँक ऑफ चायनाच्या शाखेबाहेरील वाढत्या निषेध आंदोलनामुळे, बँकांचे संरक्षण करण्यासाठी आणि स्थानिकांना बँकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी रणगाडे रस्त्यावर तैणात कऱण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत.
दरम्यान एप्रिल 2022 मध्ये साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर चीनमध्ये आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं. चायना मॉर्निंग पोस्टने चीनमधील बँक घोटाळा उघड केले होता. चायनीज बँकांमधून 40 अब्ज युआन गायब झाल्याचा दावा बातमीत करण्यात आला होता. यानंतर चीनच्या हेनान आणि अनहुई प्रांतातील बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे सिस्टम अपग्रेडचं कारण देत बँकांनी ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यास प्रतिबंध केल्याचं बँकांनी म्हटलं.