अकोला, दि.१५ -: मुर्तीजापुर तालुक्यातील मौजे पोही गावातील अंकुश मुळे यांच्या गर्भवती पत्नीला पुर स्थितीतुन गुरुवारी (दि.१४) शोध व बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप साबळे यांनी दिली.
मुर्तीजापुरला येणाऱ्या हीवरा-कोरडे मार्गावरील तापकळी नदीला आणि पोही-माना मार्गावरील उमा नदीला पुर आल्याने दोन्ही मार्गावरील पुलावर पाच फुटपर्यंत पाणी वाहत होते. या पुर स्थितीतून गर्भवती महिलेला गुरुवारी (दि.१४) रात्री सुखरुप बाहेर काढले. या गर्भवती महीलेस रुग्णालयात पोहोचविण्याकरीता आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात आली. ही मोहिम जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकार संजय खडसे व उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे तलाठी सुनिल कल्ले, हरीहर निमकंडे, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी बोट व पथकासह बचाव कार्य पार पडले. या मोहिमेदरम्यान पोहीचे सरपंच किशोर नाईक, कुरणखेड येथील वंदे मातरम पथकाचे सदस्य उपस्थित होते.