अकोला दि.11: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त जिल्ह्यातील आठ मुलामुलींच्या शासकिय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलैपर्यंत तर, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यानी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला, मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह अकोला, गुणवंत मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह अकोला, 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अकोला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ता.अकोट जि.अकोला, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह ता.अकोट जि. अकोला, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह ता. मुर्तिजापूर जि. अकोला, मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह ता.बार्शिटाकळी जि. अकोला या आठ शासकीय वसतीगृह सुरु असून यातील चार मुलांचे तर चार मुलींचे वसतीगृहाचा समावेश आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी, इयत्ता दहावी व अकरावी उतीर्ण तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक वा व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्याना या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी पासून ते पुढील अभ्यासक्रमाकरीता प्रवेश अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी शुक्रवार दि. 15 जूलैपर्यंत तर इयत्ता दहावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 30 जुलैपर्यंत आणि बी.ए.,बी.कॉम.,बी.एस.सी. अशा बारावी नंतरचे अभ्यासक्रमांकरीता प्रथम वर्षाचे पदविका,पदवी,एम.ए.,एम.कॉम,एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ही दि.24 ऑगस्टपर्यंत आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नास्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यांत येतो. विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथूनच अर्ज प्राप्त करुन विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहित वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह संबंधित वसतिगृहातच सादर करावेत. अधिक माहितीकरीता संबंधित शासकीय वसतिगृहात संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येत आहे.