मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. अल्पमतात सरकार आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रिमंडळ बैठकीत राजीनामा देतील असा तर्क लावला जात होता. मात्र, ते राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मिळाली आहे.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे किंवा आमदारांनी केलेल्या बंडखोरीवर कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळासमोर असलेल्या नियमित अकरा विषयावर निर्णय घेऊन ही बैठक संपली.