हिवरखेड (प्रतिनिधी) :- अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही मागण्या मान्य न झाल्यास अनेकदा नागरिक हिंसक आंदोलन करतात व त्यामध्ये मोठी जीवितहानी होते, मालमत्तेची अपार हानी होते, शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. रक्तरंजित संघर्ष होतो अनेकांचे रक्त वाया जाते तर अनेक वेळा आपल्या प्रेयसीच्या विरहात प्रियकरांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिण्याचे प्रकार सुद्धा ऐकण्यात येतात परंतु हिवरखेड वासीयांनी गांधीगिरीने रक्तसंकल्प अभियान करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी मागील 22 वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपंचायतची उद्घोषणा करण्यास विलंब करीत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने झाली.
परंतु शासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी हिवरखेड वासीयांनी रक्त संकल्प अभियान केले असून हिवरखेड नगरपंचायत साठी आणि हिवरखेड- तेल्हारा- आडसुळ यासह प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी हिवरखेडच्या जागरूक नागरिकांतर्फे आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत श्री महाराणा प्रताप जयंती निमित्त दिनांक 2 जून गुरुवारी हिवरखेड येथे रक्त संकल्प अभियान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हिवरखेड येथील तब्बल 42 जागरुक नागरिकांनी रक्तदान केले ज्याच्या माध्यमातून शेकडो जणांचे अनमोल प्राण वाचविण्याचे पुण्यकर्म होईल.
ठाणेदार विजय चव्हाण यांचे हस्ते श्री महाराणा प्रताप यांचे पूजन करून अभियान सुरू करण्यात आले. सदर अभियानाला अनेक गणमान्य व्यक्तींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी डॉ बीपी ठाकरे ब्लड बँक तर्फे डॉ संतोष सुलताने आणि त्यांच्या चमूने रक्त संकलित केले. सोबतच हिवरखेड वासियांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री ओमप्रकाश कडू, आमदार अमोल मिटकरी, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी निमा अरोरा व इतर अनेक वरिष्ठांना रक्ताने पत्र लिहिले. रक्तदात्यांनी रक्तदान करून हिवरखेड नगरपंचायत व रस्ता निर्मितीच्या संघर्षात आपला महत्त्वाचा वाटा नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायत समर्थक जागरूक नागरिकांनी व आदर्श पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी रक्तदात्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.