अकोला: मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातत्याने शेतकऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय घेतल्याने मोदी सरकारने शेतकऱ्यांचा सत्यानाश केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी केला आहे. बंद केलेली हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बाजारात हरभऱ्याच्या किंमती पडल्याने यावर्षी शासनाने सुरू केलेल्या हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून ही खरेदी सुरू असताना २३ मे पासून कोणतीही पूर्व सूचना न देता नाफेडने खरेदी बंद केली. परिणामी गेल्या ५ दिवसांपासून शेतकऱ्यांची वाहने केंद्रांवर तशीच उभी आहेत. पावसाचे दिवस असल्याने आणि नाहक वाहन भाड्याचा भुर्दंड बसत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केलेली ही खरेदी केंद्र सरकारने तातडीने सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे अमानकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी यासंदर्भात त्यांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात धाव घेऊन माहिती घेतली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खुमकर, अतुल अमानकर, निलेश मुरकुटे उपस्थित होते.
हजारो क्विंटल हरभरा शिल्लक नाफेडने खरेदी बंद केलेली असली. तरी अद्याप एकट्या अकोला जिल्ह्यात जवळपास दहा हजार क्विंटल हरभरा मोजमाप करण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यापेक्षा जास्त हरभरा शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खरेदीची मुदत वाढवून हा सर्व हरभरा खरेदी करण्याची गरज असल्याचे यावेळी सुधाकर खुमकर म्हणाले.