पुणे : शहरात दशकातील यंदा सर्वांत कमी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्याला सामोरे जावे लागले. मार्च ते मे 2022 या कालावधीत तब्बल 69 टक्के पाऊस कमी झाल्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी शहरात वर्षभर पाऊस पडत होता. त्यामुळे वर्षाच्या शेवटी ती सरासरी 750 मिमीवर पोहोचली.
यात अवकाळी पावसाचा वाटा 35 ते 40 टक्के होता. मात्र, यंदा मार्च, एप्रिल व मेमध्ये उणे 69 टक्के पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. 15 मार्चपासून शहरात उष्णतेची लाट सुरू झाली. त्यानंतर 24 ते 31 मार्च व त्यापुढे 14 एप्रिलपर्यंत ही लाट होती. पुढे अवकाळी पाऊस पडेल, असे वाटत असताना शहरात एक थेंबही पाऊस झाला नाही. मार्च व एप्रिल हे दोन्ही महिने कोरडे गेले.