” मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे राज्यसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी ‘ स्वराज्य ‘ या संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणाही केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (दि.१२) आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यासाठी आपण भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतीनियुक्त खासदार होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, तर मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असे मत व्यक्त करत स्वराज्य या नवीन संघटना स्थापनेची त्यांनी घोषणा केली. या संघटनेअंतर्गत शिवप्रेमी, शाहूप्रेंमीना एका छताखाली आणणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपती कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, त्यांनी आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंनी ” एकला चलो रे”… चा नारा देत, अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
२०१७ पासून महाराष्ट्र फिरलो. विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न समजून घेतले. शाहूंच्या विचारांप्रमाणेच आजपर्यंत वाटचाल केली आहे. सत्ता असेल तर आपलेला बदल घडवता येतो. ६ वर्षात राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून सेवा देत आलो, याचा मला आनंद आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.