बेल्जियममध्ये तयार होत असलेल्या लोकप्रिय किंडर चॉकलेटमधून साल्मोनेलोसिस जीवाणूचे संक्रमण झाल्याची १५० हून अधिक प्रकरणे ११ युरोपीय देशांत आढळून आली आहेत. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. साल्मोनेलोसिस हा साल्मोनेला या जीवाणूमुळे होत असलेला एक आतड्यांसंबंधी रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव युरोप आणि अमेरिकेत अधिक दिसून येत आहे. याचा मुले आणि वृद्ध व्यक्तींना डिहायड्रेशनशी संबंधित गंभीर गुंतागुंत होऊन धोका होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, WHO ने म्हटले आहे की ब्रिटनने एक महिन्यापूर्वीच या चॉकलेटमध्ये साल्मोनेलाचे जीवाणू आढळून आल्याचे सांगत सतर्क केले होते. या जीवाणूचे संक्रमण झाल्याची प्रकरणे बेल्जियम ते अमेरिकेपर्यंत आढळून आली आहेत. साल्मोनेला जीवाणू संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरातून किंडर चॉकलेटची विक्री थांबवण्यात आली आहे. या जीवाणूमुळे १० वर्षाहून कमी वयाची मुले संक्रमित होत आहेत. तर एकूण संक्रमित प्रकरणांमध्ये मुलांचे प्रमाण ८९ टक्के आहे. मात्र या संक्रमणामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.