नाशिक- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला हक्क चळवळीतील अग्रेसर नेत्या श्रीमती विजयाताई मालुसरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन कन्या, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य तसेच मायको (बाॅश) कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस सुनिल मालुसरे यांच्या त्या मातोश्री होत. एसटी कामगार संधटनेचे दिवंगत नेते विनायक तथा भाऊ मालुसरे यांच्या त्या पत्नी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत नरेंद्र तथा नाना मालुसरे यांच्या त्या वहिनी होत. सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा संघटक संजय मालुसरे यांच्या त्या काकू होत.