अकोला– अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अकोला कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अकोट व चोहट्टा बाजार येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी दोघा दुकानदारांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त सविस्तर माहिती या प्रमाणे, सोमवारी (दि.11) अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी मे. भगवती तेल केंन्द्र, तपेश्वरी मंदिराजवळ, अकोट येथे अचानक छापा टाकला असता या दुकानात प्रतिबंधीत अन्न पदार्थ विमल पानमसाला, फिदा स्वीट सुपारी, प्रेम धन फिलींग्स इलायची सुपारी, प्रेम धन फिलींग्स चंदन स्वीट सुपारी विक्री होत असल्याचे व साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेल्या या अन्न पदार्थाची एकुण किंमत 3 हजार 210 रुपये इतकी आहे. हा साठा जप्त करुन दुकानाचा मालक राहुल केदार शर्मा याचे विरुद्ध अकोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच चोहट्टा बाजार येथील व्यापारी रफिकशाह नाजुलशाह आश्कान यांच्या मे. रफिक किराणा ॲण्ड कोल्ड्रींक्स दुकानात नितीन नवलकार यांनी छापा टाकला असता तेथे विमल पानमसाला, व्ही-1 सुंगधीत तंबाखु, वाह पानमसाला, डब्ल्यु च्युविंग तंबाखु, पान बहार पानमसाला, BHR खानदानी तंबाखु, हॉट पानमसाला, H-5 प्रिमियम च्युविंग तंबाखु, नजर गुटखा या अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्याची एकुण किंमत 1 हजार 934 रुपये इतकी आहे. या प्रकरणी दुकानदार रफिकशाह नाजुलशाह आश्कान याचे विरुद्ध दहिहांडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही दुकानदारांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 26 (2) (i), 26 (2) (iv) इ. तसेच भा. दं. वि. चे कलम 328, 188, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावती सह आयुक्त शरद कोलते व सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी केली. त्यांना नमुना सहायक भिमराव नरवणे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.