अकोला दि.२५: दुकानांचे नामफलक मराठी भाषेत अनिवार्य असल्याबाबतची तरतूद महाराष्ट्र दुकाने व आस्थापना( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये करण्यात आली आहे. तथापि, नामफलक मराठी भाषेत व देवनागरी लिपीत असण्यासोबतच मराठी अक्षरांचा टंक अन्य भाषांतील टंकापेक्षा आकाराने लहान असणार नाही, तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले किंवा विकले जाते अशा आस्थापना आपल्या नामफलकावर महान व्यक्तिंचे किंवा गड किल्ल्यांचे नावे लिहिणार नाही, अशी सुधारणा महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे. गुल्हाने यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रत्येक दुकानाचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य असेल अशा प्रकारची तरतूद महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये करण्यात आली असून त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, कलम ७ अन्वये ज्या आस्थापनेत १० पेक्षा कमी कामगार आहेत तसेच कलम ३६ क (१) अन्वये नोंदणी केलेल्या अशा सर्व आस्थापनांना आपल्या आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल, अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाषेतील वा लिपीतील नामफलक देखील असू शकतात. परंतू मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षराचा टंक (FONT) अन्य भाषेतील टंकापेक्षा आकाराने लहान असणार नाही, तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापना त्यांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिणार नाही, असा बदल या अधिनियमात करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील आस्थापनांच्या मालकांनी या प्रमाणे पालन करावे, तसेच या तरतुदीचा भंग केल्यास मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असे सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे. गुल्हाने यांनी कळविले आहे.