युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाकडून तीन वेळा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ते लपून बसलेले आहेत, असे रशियाकडून सांगण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी सोशल मीडियावरून रशियाला लोकेशन शेअर करून थेट आव्हान दिले आहे की, “मी कुठेही लपलेलो नाही आणि मी कुणाला घाबरतही नाही…”
वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी इन्स्टाग्रामवरील ८ मिनिटांचा व्हिडिओ आपले लोकेशन शेअर म्हटले आहे की, “मी कीव्हमध्ये बाकोवा स्ट्रीटवर राहतो. मी लपलेलो नाही. मी कोणालाही घाबरत नाही. या युद्धात देशाला जिंकून आणण्यासाठी काहीही करण्याची तयारी आमची आहे”, असे म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाला थेट आव्हान केलेले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार झेलेन्स्की (Zelenskyy) यांची हत्या करण्यासाठी पुतीन यांच्या आदेशावरून रशियन सैन्याकडून ३ वेळा प्रयत्न करण्यात आला आहे. अशात झेलेन्स्की यांनी आपल्या कार्यालयात बसून ८ मिनिटांचा व्हिडिओ करत म्हटलेले आहे की, “आज आमच्या संघर्षाची १२ संध्याकाळ आहे. आम्ही सर्व मैदानात आहोत. आम्ही सर्वजण काम करत आहोत. मी सध्या कीव्हमध्ये असून माझी टीम माझ्यासोबत काम करत आहे.”
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मारले गेले, तर पुढची आखणी काय असेल, याची योजना युक्रेनकडून करण्यात येत आहे. दरम्यान, युक्रेनसह शेजारच्या पोलंड आणि रुमानियामधून येणाऱ्या निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी युरोपीय महासंघाच्या सर्व २७ सदस्य राष्ट्रांनी ‘सर्व संसाधानांचा’ वापर करावा, असे आवाहन महासंघाचे परराष्ट्र व्यवहार धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी फ्रान्समधील मोंटपेलियरमध्ये केले आहे.