अकोला, दि.२१: जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार, शुक्रवार दि.२५ ते गुरुवार दि.१० मार्च या कालावधीत शिधापत्रिकांसंदर्भात प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
या विशेष मोहिमेत शहरी व ग्रामीण भागात शिधापत्रिकेसंदर्भातील प्रलंबित बाबींचा निपटारा केला जाणार आहे.सर्व गरजू व पात्र लाब्हार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे. तिहेरी शिधापत्रिका योजनेअंतर्गत पात्रता निकषांच्या आधारे पिवळी, केशरी व शुभ्र शिधापत्रिका वितरीत केली जाणार आहे. तसेच शिधापत्रिकासंदर्भाने नागरिकांकडून प्राप्त अर्जांचा जलदगतीने निपटारा केला जाणार आहे.
नविन शिधापत्रिका वितरीत करणे, दुय्यम शिधापत्रिका वितरीत करणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करणे इ. बाबींवर नागरिकांचे अर्ज स्विकारुन या कालावधीत त्यावर कार्यवाही केली जाईल. या कालावधीत ग्रामपातळीवर ग्रामस्तरीय दक्षता समितीचे सदस्य सचिव तलाठी यांच्या मार्फत तसेच अकोला शहरात अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अधिनस्त सेतू केंद्रात अर्ज स्विकारले जातील. तरी नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या शिधापत्रिकेसंदर्भातील सर्व तक्रांरींचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.