हिजाब परिधान करून महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना प्रवेश बंदीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकचे लोन महाराष्ट्रात पसरले असून मुर्तिजापूर शहर पोलिसांनी या संदर्भात नोटीस जारी करून सर्व सोशल मीडियाच्या अॅडमिनला खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. उपरोक्त विषया संदर्भात कॉमेंटस, चॅटींग अथवा व्हिडीओ छायाचित्राचे आदानप्रदान करू नये अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनोरी, हातगाव, चिखली, कासवी आदी ठिकाणच्या सोशल मीडियातील सर्व ग्रुप अॅडमिनला हा निर्वाणीचा इशारा देण्यात आला असून हिजाब संदर्भात कुठलेही विषयाला हात घालू नये, फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम या माध्यमातून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी. कळत नकळत एखाद्याकडून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या बाबीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन वित्त व जीवितहानी झाल्यास त्याला संबंधित व्यक्ती किंवा ग्रुपचा सदस्य जबाबदार धरण्यात येईल. झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई सुद्धा करण्यात येईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश कलम १४९ जाफ़ौ ची नोटीस बजावून देण्यात आले आहे.