पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार न घेता महिनाभर पुढे ढकला, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ऑनलाईन बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य मंडळातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात होणार्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या, अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत केल्या आहेत. मागील दोन वर्षांत शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती.
मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाईन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे, त्यामुळेदेखील विद्यार्थी संभ—मात आहेत. तसेच अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मार्च महिन्यात होणार्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना बच्चू कडू यांनी बैठकीत दिल्या. त्यानुसार राज्य मंडळाचे अधिकारी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार आहेत. त्यानुसार परीक्षा कधी घ्यायच्या हे निश्चित होऊन नवीन वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
2020-21 ची परीक्षा रद्द होऊन अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची परीक्षा देण्याची मानसिकताही तयार झाली होती. परंतु आता परीक्षा पुढे जाणार असल्यामुळे संभ—म निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. तर शिक्षक, पालक विद्यार्थी यांची परीक्षा पुढे ढकलण्याची कोणतीही मागणी नाही. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.