सांगली : राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून,राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विरोधकांना धुळ चारली आहे.या ठिकाणी १७ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आर,आर पाटील यांचे चिरंजीव विरूद्ध सर्व पक्ष अशी लढत असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या ठिकाणी रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार संजय पाटील,शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे,राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस आणि शेतकरी विकास आघाडी आर.आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटलांच्या विरोधात असतानाही १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारत कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.