मुंबई: राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध आणखी वाढवू पण लॉकडाऊन होणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. वेळ पडल्यास कठोर निर्बंध घालू, असेही त्यांनी नमूद केले आहे.
मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, रायगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. त्यासाठी निर्बंधाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. पण लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊनचा अर्थ नाहीच. लॉकडाऊनची भिती माध्यमांनी घालू नये. रुग्णसंख्या वाढत असल्याने जरुर निर्बंध वाढवले पाहिजेत, असे टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणांवर होतो. यामुळे लाॅकडाऊन नाहीच, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
डेल्टा आणि ओमायक्रॉनचं रुग्ण यांच्यातील प्रमाण कळणं महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
ऑक्सिजनची ७०० मेट्रिक टनांहून अधिक गरज लागल्यास राज्यात ॲटो लाकडाऊन लागू होईल. सध्या लॉकडाऊनचा विचार नाही. राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाण्यात नवे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यासह 5 शहरांतील कोरोना वाढीवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर येऊ घातलेले निर्बंध खास करून मुंबई आणि ठाण्यात अधिक कडक असू शकतात, असे संकेत देण्यात आले आहेत.
राज्यात नवीन आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.