अकोला,दि.29: अकोला जिल्ह्यात आज (दि.२८) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आज जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वीज कोसळणे व गारपीट या नैसर्गिक आपत्तीची घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तूर, हरभरा, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तसेच वीज कोसळल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यादृष्टीने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. असे निर्देश पालकमंत्री ना.कडू यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानीचे अहवाल देऊन मदतनिधी बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे पालकमंत्री कडू यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.