मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्डचे (Covishield vaccine) उत्पादन ५० टक्क्यांनी कमी हेणार आहे. यासंदर्भात सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पूनावाला यांनी सांगितले की, सध्या कोव्हिशील्ड लसीचा पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक आहे. केंद्र सरकारने आमच्याकडे केलेल्या ऑर्डरची पूर्तता पुढील आठवड्यात पूर्ण होईल. त्यामुळे आम्हाला लस उत्पादन कमी करावे लागणार आहे. कंपनी महिन्याला २५ ते २७ कोटी लसीचे डोसचे निर्मिती करत आहे. आता आम्ही केंद्र सरकारकडे आवश्यक डोसच्या संख्येची माहिती मागितली आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारला आवश्यक असणार्या डोसची माहिती आम्ही घेणार आहोत. काही दिवसांमध्ये आम्हला ती मिळेल. त्यानंतर लस निर्यात करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले.
मागील आठ महिने आम्ही केंद्र सरकारच्या मागणीनुसार लसीचे उत्पादन केले. तसेच निर्यातही बंद केली. अनेक देशांनी अमेरिकेकडून लस आयात केली. आता देशातील मागणी कमी झाल्यानंतर आम्ही लस निर्यातीचा विचार करणार आहोत, असेही पुनावाला यांनी सांगितले.