अकोला,दि.4: कोविड-19 च्या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. नागरीकांनी लसीकरण करावे याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनाअंतर्गत ग्रामीणस्तरावर लसीकरणाला गती देण्याकरीता जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामपंचायतींसाठी प्रोत्साहनपर योजना राबविली जात आहे. त्यानुसार रविवार दि. 10 डिसेंबरपर्यंत नागरिकांचे 90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण करुन घेणाऱ्या ग्रामपंचायतीना विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
रविवार दि. 10 डिसेंबरपर्यंत 90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सन्मान पत्र देवुन सन्मान करण्यात येईल. तसेच तालुकास्तरावर 90 पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायती मधुन लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीना विशेष पुरस्कार देण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधुन 90 पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायंतीमधुन लकी ड्रॉ. पद्धतीने तीन ग्रामपंचायतीना जिल्हास्तरावरुन विशेष पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात येईल.
स्पर्धेत विजेता ग्रामपंचायतीना सर्व पुरस्कार जिल्हा परीषद व जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या भागातील नागरीकांनी पहिला डोस पुर्ण करणे व देय असलेल्या दुसऱ्या डोसबाबत नागरीकांना प्रेरीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच आपल्या गावातील नागरीकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेमध्ये सहभाग घेण्याबाबत आवाहन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.