अकोला- कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे जिल्ह्यातील सर्वाधिक लसीकरण झाले आहे. सर्वाधिक लसीकरण केल्याबद्दल आशा, अंगनवाडी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. जिल्ह्यातील इत्तर गावांत लसीकरणाची गती वाढवून 100 टक्के लसीकरण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे जिल्हाधिकारी यांनी भेट देवून लसीकरणाबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष शर्मा, गटविकास अधिकारी श्री. वाटेकर, गटशिक्षणाधिकारी गौतम बडवे, सरपंच दिपमाला वानखडे, जिल्हा क्षेत्र लसीकणर निरीक्षक उमेश ताठे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरु असून गायगाव येथे जिल्ह्यातील सर्वाधिक लसीकरण झाले आहे. गायगाव येथे एकूण 3855 लोकसंख्या असून लसीकरणाकरीता पात्र लसवंत 2776 असून त्यापैकी पहिला डोज घेतलेले 2749 लसवंत आहे. तर दुसरा डोज घेतलेले 1128 लसवंत आहे. हे प्रमाण जिल्ह्यातील सर्वाधिक आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी दिली.