अकोला, दि.२३: महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राज्यातील खेळाडु व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस योजना राबविण्यात येते, या योजनेसाठी जिल्ह्यातील खेळाडू व मार्गदर्शकांकडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने प्रस्ताव मागविले आहेत.
याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या योजनेसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक/ज्युनियर एशियन/विश्व अजिंक्यपद स्पर्धा/शालेय आशियाई स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराएशियन स्पर्धा या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या खेळाडू व मार्गदर्शकांनी प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे त्यांनी अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्ण, रौप्य व कास्य पदक संपादन केलेले हवे. तसेच खेळाडुचे/मार्गदर्शकाचे महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असणे अनिवार्य आहे. पात्र खेळाडू व मार्गदर्शकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा. तसेच विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन संपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव मंगळवार दि.३० नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.