अकोला, दि.१७: स्थानिक क्रीडा मंडळे व क्रीडा क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने क्रीडा, व्यायाम यासाठी पायाभूत सुविधा उभारणी करण्यावर भर द्यावा व त्यातून अकोला जिल्ह्यातून अधिकाधिक गुणवान व दर्जेदार खेळाडू निर्माण होऊन क्रीडा संस्कृतीची जोपासना करावी, असे निर्देश जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
जिल्हा क्रीडा संकूल समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य)डॉ.सुचित्रा पाटेकर, कार्यकारी अभियंता डि. व्ही. नागे, मनपा क्रीडा अधिकारी अनिल बिडवे तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने विविध मुद्यांची माहिती सादर करण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधा भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या नगर रचना विभागामार्फत भाडयाचे दर निर्धारित करावे, असे श्रीमती अरोरा यांनी सांगितले. स्व. वसंत देसाई स्टेडीयम येथे बी. ओ. टी. तत्वावर सार्वजनिक सुविधा निर्मिती तसेच अन्य क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास समितीची मान्यता देण्यात आली. अकोला शहरातील मोकळे भुखंड तसेच शाळा परिसरात क्रीडा व व्यायाम सुविधा उभारून त्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या क्रीडा सुविधांचे संचलन क्रीडा मंडळे व क्रीडा संस्था यांच्यामार्फत करण्यात यावे. याद्वारे अकोल्यातील क्रीडा चळवळीला बळ मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जिल्हा क्रीडा संकुलातील दुकाने व गाळ्यांचे भाड्याच्या दरांचे पुनर्गठन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले.