अमरावती : Amravati Crime : शारीरिक संबंधाचा व्हिडिओ पूर्व प्रियकराने अमेरिकेवरून महिलेच्या पतीच्या ईमेलवर पाठविला. या प्रकरणी तक्रार पुणे येथे नोंदवली असून अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. पतीच्या ई-मेल आयडीच्या ड्रॉप बॉक्समध्ये एक मेल पूर्व प्रियकराने पाठविला. त्यावरील लिंक ओपन करताच लग्नापूर्वी प्रियकरासोबत झालेल्या शारिरीक संबंधाचा व्हिडिओ दिसला. जुन्या प्रियकराने आपले खासगी छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याचा प्रकार पाहून पीडित महिलेने या घटनेची तक्रार पुणे शहर पोलिसात नोंदविली.
परंतु 2014 मध्ये झालेल्या या लैंगिक संबंधाचे घटनास्थळ अमरावतीमधील फ्रेजरपुरा हद्दीतील आहे. त्यामुळे हे प्रकरण पुणे शहर पोलिसांकडून अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलिसाकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी राज ज्ञानेश्वर धोंडे (रा. अंबर अपार्टमेंट, एचव्हीपीएम जवळ) याच्याविरुध्द लैंगिक अत्याचार, विनयभंग व बदनामी केल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
2014 मध्ये खोलीत मोबाईल कॅमेरा ऑन करून शुटिंग
महिलेच्या तक्रारीनुसार, ती अमरावतीत बारावीचे शिक्षण घेत असताना, तिची ओळख राज धोंडेसोबत झाली. मैत्रीचे रुपातंर प्रेमात झाले. दरम्यान, दोघांमध्ये भेटीगाठी झाल्या. त्यानंतर राज धोंडे हा नोकरीसाठी वडिलांसोबत अमेरिकेला गेला. त्यानंतर ऑक्टोंबर 2015 मध्ये तो भारतात परतल्यानंतर तो अमरावतीत येऊन भेटला. त्याने लग्नाची इच्छा दर्शविली, परंतु त्याच्या हट्टी व बळजरीच्या स्वभावामुळे तिने लग्नास नकार दिला. मात्र, दोघांची मैत्रीपूर्ण संबध सुरुच होते. दरम्यान, एकदा राजने तिच्या मोबाईलमधील डेटा ट्रान्सफर करून घेतला. त्यात तिचे खासगी फोटो व माहिती होती. त्यानंतर खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजने तरुणीला एका भाडे तत्वावरील खोलीत नेऊन लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने खोलीत मोबाईल कॅमेरा ऑन करून व्हिडिओ शूट केला.
Amravati Crime : भांडण झाल्यानंतर ‘तो’ गेला अमेरिकेत….
तरुणी व राजमध्ये वाद झाल्यानंतर ब्रेकअप झाला. त्यानंतर 2015 मध्ये शेवटी राज धोंडे अमेरिकेत गेला. 2016 मध्ये राजने फेसबुक आयडी तयार करून, त्यावरून तरुणीच्या बहिणीला तिचे फोटो पाठविले. 2 जुलै 2021 रोजी फेसबुकवर तरुणीचे फेक अकाऊंट उघडून तिचे नातवाईक व मित्रांना शारिरीक संबधाचे फोटो पाठवून व्हायरल करीत बदनामी केली. त्यामुळे पीडित तरुणीने पुणे शहरातील सायबर पोलिसात तक्रार नोंदविली. परंतु तक्रार करण्यापूर्वी ते फेक अकाऊंट डिलीट झाल्यामुळे तरुणीला माहिती मिळाली नाही. परंतु त्यानंतरही राजने पाठलाग करून बदनामीच्या उद्देशाने पीडितेच्या पतीलाही मेलवर व्हिडिओ पाठविला, असा आरोप पीडित महिलेने तक्रारीतून केला आहे