पारगाव (पुणे) : पुणे शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवे वस्तीत सोमवारी (दि. ८) सकाळी बेपत्ता झालेला चिमुकल्याचा मृतदेह मंगळवारी (दि. ९) सकाळी घराच्या पश्चिमेला असलेल्या गोबर गॅसच्या बंदिस्त टाकीत आढळून आला. गाढवे वस्तीतील विलास कुंडलीक गाढवे यांचा दोन वर्षांचा मुलगा कृष्णा हा सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. येथे बिबट्याचा वावर असल्याने बिबट्यानेच कृष्णाला पळवले असल्याचा संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला होता.
पुणे शिंगवे : स्थानिक तरुणांच्या मदतीने कृष्णाचा शोध
त्यानुसार वनविभागाच्या रेस्क्यू टीमने व स्थानिक तरुणांनी येथील जवळपास सात ते आठ एकर उसाचे क्षेत्र पिंजून काढले. परंतू कृष्णा सापडला नाही. सायंकाळी वन विभागाने शोधकार्य थांबवत त्यानंतर वन विभागाने रात्री उशिरा पिंजरादेखील तेथे लावला. मंगळवारी सकाळी पुन्हा स्थानिक तरुणांनी कृष्णाचा शोध सुरू केला. त्यावेळी घराच्या पश्चिम दिशेला वैभव शिवाजी गाढवे यांना कृष्णाचा लाल रंगाचा शर्ट दिसला. त्यावेळी जवळ जाऊन पाहिले तर कृष्णाचा मृतदेह फुगूनवर आला होता. कृष्णाचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याची आई सविताने हंबरडा फोडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.