पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे वीजबील थकले की महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत केला जातो व त्याचा फटका सार्वजनिक पाणी पुरवठ्यास व पर्यायाने ग्रामस्थांना बसतो असे चित्र सर्वत्र पहावयास मिळतो. यावरच उपाय म्हणूनच पुणे जिल्हा परिषेच्या वतीने जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 191 पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकाच वेळी ऐवढ्या मोठ्याप्रमाणात नळ पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना झाल्या आहेत. पण वीजबील थकले की महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा खंडीत केली जातो. यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेला पाणी असूनही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. तसेच अनेक वेळा पाणी पुरवठा योजनेसाठी अव्वाच्यासव्वा बील आकारणी झाल्याने पाणी पुरवठा योजना चालविणे ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेर जाते. यामुळेच पुणे जिल्हा परिषदेने सर्व पाणी पुरवठा योजना टप्प्या-टप्प्यांनी सौर उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 3 अश्वशक्ती, 5 अश्वशक्ती, 7.5 अश्वशक्ती आणि 10 अश्वशक्ती असलेल्या अर्व पंप सौर उर्जेवर चालवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील या नळ पाणी पुरवठा सौर उर्जेवर चालणार
खेड 39, मावळ 15, बारामती 91, पुरंदर 135 , आंबेगाव 38, जुन्नर 116, शिरूर 96, इंदापूर 139, दौंड 162, मुळशी 66, वेल्हा 79, हवेली 101, भोर 114, एकूण : 1191
अखंडित पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी निर्णय
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अनेक पाणी पुरवठा योजना केवळ वीज बिल थकल्याने बंद पडल्या आहेत. अशा वेळी गावात नळ पाणी पुरवठा योजना असूनही माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागते. यामुळेच जिल्ह्यातील तब्बल एक हजार पेक्षा अधिक पाणी पुरवठा योजना पहिल्या टप्प्यात सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. शिल्लक सर्व योजना देखील भविष्यात सौर ऊर्जेवरच चालविण्याचे नियोजन केले आहे.