मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan bail hearing ) याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने आज फेटाळला. तसेच या प्रकरणातील संशयित आराेपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एक क्रूझवरील रेव्ह पार्टींवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंटसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर याप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आली हाेती. यामध्ये दोन युवतींचाही समावेश हाेता. न्यायालयांनी सर्व संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सर्वांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.
Aryan Khan bail hearing : क्रुझ ड्रग्ज पार्टीच्या कटात आर्यनचा सहभाग : एनसीबी
गेल्या १८ दिवसांपासून आर्यन खान न्यायालयीन कोठडीत आहे. यातील १४ दिवस तो आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यन खान याचा क्रुझ ड्रग्ज पार्टीच्या कटात सहभाग होता, असा आरोप ‘एनसीबी’ने आज न्यायालयात केला आहे. तसेच एनसीबीने न्यायालयात आर्यनने केलेल्या व्हॉटस ॲप चॅट सादर केले. हे सर्व चॅट ड्रग्ज विषयी आहेत. या चॅटमुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
उच्च न्यायालयात दाद मागणार
मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.