तेल्हारा-(प्रा. विकास दामोदर): तेल्हारा सांगायला तालुक्याचे शहर पण ह्या शहरात कोणत्याही दिशेने या किंवा जा हे रस्ते जणू रस्ते नसून साक्षात मृत्यूचा सापळा ठरत आहेत पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतुत या रस्त्यांची फार बिकट व दयनीय अवस्था झाली आहे.
याच रस्त्यांसाठी पत्रकार विशाल नांदोकार यांनी आमरण उपोषण केले होते तेव्हा मा. पालकमंत्र्यानी आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले होते परंतु तत्कालीन वेळी केवळ आठ ते पंधरा दिवसाचा अवधी मा. पालकमंत्र्यांनी मागितला होता त्याला आता जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरी देखील रस्त्याची अवस्था आहे तशीच. तालुक्यातील जनता पुरती हैराण झाली आहे तरी या सुस्त प्रशासनाला व लोकप्रतिनिधीना जाग येईना.
तालुक्यातील रस्त्यांबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना कुंभाकर्णी झोपेतून जाग यावी यासाठी तेल्हारा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी टॉवर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंत तप्त रस्त्यावर लोटांगण घेऊन अभिनव आंदोलन केले यावेळेस लोटांगण घेऊन अजय गावंडे, संदीप खारोडे, संदीप सोळंके यांनी देखील आपला सहभाग दाखविला सोबतच घंटानाद देखील सुरु होता यावेळी आंदोलनकर्ते यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रास्त व समर्पक असे उत्तर देऊ शकले नाही शेवटी नायब तहसीलदार राजेश गुरव, तेल्हारा पोलीस ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्यासमक्ष अभियंता यांनी लेखी आश्वासन देऊन रस्त्याचे अर्धवट काम सोडून गेलेल्या कंत्राटदारमुळे ही वेळ आली आहे व लवकरच नवीन निविदा काढून रात्यांचे काम शक्य तेवढ्या लवकर सुरु करू व लवकरच तात्पुरते खड्डे बुजवण्यात येतील असे सांगून आंदोलन थांबावण्यास सांगितले.
तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी आंदोलनात प्रा. प्रदीप ढोले, मो. सलीमभाई, ताजूभाऊ ऍड. पवन शर्मा, अमोल पाटील ढोले, अवचार पाटील, सौं. दीपिका देशमुख, मुन्नाभाई,तथा बहुतांश महिला वर्ग तथा पुरुष मांडळी यांनी स्वयंस्फूर्ती व हिरारीने सहभाग घेतला.