पंजाबमधील काँग्रेस पक्षामधील हालचाली पाहता देशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेनेही सामना मुखपत्रातून काॅंग्रेसच्या चुका दाखवल्या आहेत आणि सल्लाही दिलेला आहे. पण, शिवसेना पक्षाने नेहमीप्रमाणे भाजपवर टीका करण्याची संधीही सोडलेली नाही.
काॅंग्रेसच्या परिस्थितीची सांगत शिवसेना म्हणते की, काॅंग्रेस पक्षाचे काय होणार, “असा अनेकांना घोर लागला आहे. महात्मा गांधी त्यांच्या इच्छेनुसार काॅंग्रेसचे विसर्जन सुरू आहे काय? अशा आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे आणि भाजपच्या विस्तारामुळे काॅंग्रेसची हालत ‘पतली’ झाली आहे.”
शिवसेना म्हणते की, मागील ७-८ वर्षांचा विचार केला तर काॅंग्रेसची अवस्था बरी नाही. काँग्रेसच्या वाड्यातले उरले-सुरले वतनदार देखील सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा मुळापासून हादरला आहे. कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पदावरून दूर केलं. प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धूंनी पेढे वाटत भागडा केला. पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढचं संकट वाढवलं. सिद्धूंच्या सततच्या कटकटीमुळे अमरिंदर यांना दूर केलं. आता सिद्धूही गेले काँग्रेसच्या हाती काय उरलं?”, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे
काॅंग्रेसला सल्ला देताना शिवसेना म्हणते की, “भाजपाकडे मंत्रीपदं वाटण्याची क्षमता आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणं म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे, त्यामुळे काँग्रेसचं काय होणार, असा घोर लागलाय. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी सुरू असलेले उपचार चुकीचे आहेत का याचा विचार व्हायला हवा. काँग्रेसनं उसळी मारून उठावं, मैदानात यावं अशी लोकभावना आहे. पण त्यासाठी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”, अस मत काॅंग्रेसने अग्रलेखातून मांडलं आहे.
अमरिंदर सिंग यांच्याविषयी शिवसेना म्हणते की, “भाजपात जाण्याच्या शक्यतेला अमरिंदर सिंग यांनीच पूर्णविराम दिला आहे. पण आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील असं दिसत आहे”, असं भविष्य शिवसेना पक्षाने मांडलं आहे.