औरंगाबाद: Marathwada rain update : सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे मराठवाड्यात अक्षरश: अस्मानी संकट कोसळले. ठिकठिकाणी पूर आला, तलाव, धरणे भरून वाहू लागली, अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला. या जलसंकटात आतापर्यंत दहा नागरिकांचा मृत्यू झाला असून 203 जनावरे वाहून गेली. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत घरांवर अडकलेल्या 45 जणांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षितस्थळी हलविले.
गेल्या अनेक वर्षांत झाला नाही इतका पाऊस कोसळल्याने मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत शेतांचे तळे झाले आहे. यंदाच्या मोसमात सलग तिसर्यांदा पावसाने मराठवाड्याला असे झोडपले.
Marathwada rain update : शेकडो घरे पाण्यात
विभागातील 421 पैकी तब्बल 182 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यातील 64 मंडळांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. केजमधील उसूफ मंडळात तब्बल 211 मि.मी. आणि होळमध्ये 208 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. शेकडो घरे पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. जालन्यात 1, परभणी 2, बीड 3, उस्मानाबाद 2 तर नांदेड, लातूरमध्ये प्रत्येकी 1 असे दहा बळी मंगळवारच्या पावसाने घेतले.
Marathwada rain update एनडीआरएफ दाखल
पुण्याहून एनडीआरएफची एक टीम उस्मानाबादच्या कळंब तालुक्यात वाकडी ईस्तळ येथे तर दुसरी टीम लातूरच्या रेणापूरमध्ये दाखल झाली आहे. वाकडी येथे मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे तीन घरांना पाण्याने वेढले होते. घराच्या छतावर अडकलेल्या 15 ते 20 जणांना या तुकडीने सोडवले. रेणापुरातही 25 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पथकाने हेलिकॉप्टरची मागणी केली होती. परंतु त्यापूर्वीच नागरिकांची सुटका होऊ शकली, असे विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले.
पाण्याच्या प्रवाहात बस वाहून गेली
पुलावरून पाणी वाहत असताना एस.टी. बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला आणि पाण्याच्या प्रवाहात बस वाहून गेली. चालक स. रे. सुरेवावर (चालक), मि.ल. नागरीकर (वाहक), इंदल रामप्रसाद मेहेंद्रे, शेख सलीम (रा. पुसद) असे चौघे जण यात वाहून गेले आणि अन्य दोघे बचावले. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान उमरखेड पुसद रस्त्यावर दहागाव येथील लोणाडी नाल्यावर हा प्रकार घडला.
ही बस नांदेडहून पुसदमार्गे नागपूरला निघालेल्या या बसमध्ये चालक, वाहकासह चार प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी एक प्रवासी शरद फुलमाळी ( रा.पुसद) यांनी संकटकालीन दारातून बाहेर येऊन झाडाच्या फांदीचा आश्रय घेतला. तर दुसरा प्रवासी अविनाश राठोड या तरुणाने वाचवला. एस.टी.बसबाहेर येण्यासाठी एकजण धडपड करीत असल्याचे दिसताच अविनाशने पाण्यात उडी घेऊन सुब्रह्मण्यम शर्मा ( रा. तेलंगणा) या शिक्षकास वाचवले.
पुलावरील पाणी ओसरल्यानंतर नाल्यातील गाळामध्ये रुतलेली बस काढण्याचे प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे एक मृतदेह खूप उशिरा हाती लागला तर उर्वरित तीन मृतदेह बसमध्ये अडकून पडलेले होते.
यंदाच्या पावसाळ्यात दहागावच्या या छोट्या पुलावर एसटी बस वाहून गेल्याची तिसरी घटना आहे.