अकोला दि.२८: हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे इ. मधुन पूर्ण क्षमतेने पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीत वाहने नेतांना वाहनचालकांनी दक्षता घ्यावी, अशा सुचना देण्यात याव्या, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत.
पुरस्थितीत एस.टी. बस वा अन्य खाजगी प्रवासी वाहने यांनी पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहन नेऊ नये, तसेच वाहने नेतांना अधिक दक्षता घ्यावी, असे आपल्या वाहनचालकांना व वाहकांना कळवावे, असे विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना निर्देश देण्यात आले आहेत. तर खाजगी बसेस, यात्रा कंपनी यांना व त्यांच्या वाहनचालकांना सुचना देण्याबाबत उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.