कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स (Kalbhairav Travels) या खासगी बसच्या चालकाने प्रवाशांना आणि बसला जंगलभागात सोडून पलाय़न केले. सारे प्रवासी गाढ झोपेत असताना हा प्रकार केला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. ( driver of Kalbhairav Travels fled leaving the passengers, bus in the forest at midnight)
रात्री 3 वाजता एका प्रवाशाला जाग आली. त्याने गाडी का थांबलीय हे पाहण्यासाठी सीटवरून उठून पुढे जाऊन पाहिले. तर तिथे ड्रायव्हर दिसला नाही. काही मिनिटे वाट पाहिली परंतू तो न आल्याने त्या प्रवाशाने इतर प्रवाशांना उठविण्यास सुरुवात केली. त्यांना या प्रकाराची माहिती दिली.
बस चिपळूणमधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबविलेली असल्याने प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला अखेर पहाटे सव्वाचारच्या सुमारास चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले. त्यानंतर बसचा मालक, त्यांचा बुकिंग एजंट यांचे फोन लावण्यास सुरुवात झाली. परंतू त्यांच्यापैकी कोणाचेही फोन लागत नसल्याने प्रवाशांना मदत मिळू शकली नव्हती.