अकोला दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाला कडक निर्बंधांची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून सुरु झाली होती. तेव्हापासून ते दि. 23 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात चार लाख 68 हजार 100 थाळ्यांचे मोफत वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार झाला.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, दि. 15 एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध सुरु झाले होते. त्यापार्श्वभुमिवर रोजंदारीने कामावर जाणारे, गोरगरिब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यातीलच एक. त्या आधी शिवभोजन थाळी ही पाच रुपये दराने उपलब्ध होत होती. निर्बंधांच्या कालावधीत हीच थाळी शासनाने विनामूल्य तसेच शक्य तिथे पार्सल सुविधेद्वारे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील 27 शिवभोजन थाळी केंद्रांवरुन जिल्ह्याभरात चार लाख 68 हजार 100 थाळ्यांचे मोफत वितरण झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी ही योजना दि.26 जानेवारी 2020 पासून सुरु झाली. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपये दराने भोजन दिले जाते. मात्र नंतर कोरोना कालावधीत शासनाने हे दर पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे केले. कडक निर्बंधांच्या कालावधीत (दि.15 एप्रिल पासून) आतापर्यंत जिल्ह्यातील 27 केंद्रामधुन चार लाख 68 हजार 100 थाळ्यांचे मोफत वितरण झाले. शहरी भागात आपल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना असून त्याचा लाभ गरीब आणि गरजू जनतेला होत आहेत. या शिवभोजन थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या दोन चपाती, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मृद भात आणि 100 ग्रॅमचे एक वाटी वरण इतके भोजन देण्यात येते. शिव भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद देत आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त पाच रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून दिले. तर आता संचारबंदीच्या कालावधीत शासनाव्दारे मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या मुख्यालयी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहरात शासकीय मेडिकल कॉलेज, निदाल शैक्षणिक आणि सामाजिक महिला बहुउद्देशीय संस्था, सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था मलकापूर, संत गाडगे महाराज महिला बचत गट, स्वराज्य महिला बचत गट, माऊली शिवभोजन, हरीहर पेठ जूने शहर, अकोला रेल्वे स्टेशन समोर असे आठ ठिकाणी, बार्शीटाकळी येथे रोहित शिवभोजन केंद्र, श्रीराम शिवभोजन केंद्र, दिव्यांग प्रेरणा शिवभोजन केंद्र, सम्राट शिवभोजन केंद्र, संत गजानन शिवभोजन केंद्र असे पाच ठिकाणी, मुर्तिजापूर येथे अन्नपूर्णा माता बहुउद्देशीय संस्था, ज्ञाननर्मदा बहुउद्देशीय संस्था, शाम उपहार गृह, विजयलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था, आय टी आय कॉलेज मुर्तिजापूर या पाच ठिकाणी, तेल्हारा येथे ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र, चंचल शिवभोजन केंद्र, सातपुडा हॉटेल व कॅटर्स, शिवबा शिवभोजन या चार ठिकाणी तर पातूर येथे विजय शिवभोजन केंद्र, चान्नी ता. पातूर या दोन ठिकाणी, बाळापूर येथे शिवभोजन केंद्र बाळापुर व संतकृपा शेतकरी बचत गट निंबा फाटा या दोन ठिकाणी, अकोट येथे इच्छा पुर्ती शिवभोजन केंद्र, असे एकूण 27 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु आहेत. आताही निर्बंध शिथिल झाले असले तरी लोक या थाळीचा लाभ घेऊन आपली भूक शमवित आहेत.