अकोला- गर्भवती माता व स्तनदा माता यांचे आरोग्य चांगले राखता यावे तसेच सुरक्षित मातृत्व व सुदृढ बालकासाठी शासनाने दिलेल्या अर्थसहाय्यामुळे मोलाची मदत होते. त्यासाठी या योजनेचा लाभ अधिकाधिक मातांपर्यंत पोहोचवावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुकाणू व संनियंत्रण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पार पडली. यावेळी न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा चिकित्सक विभागाचे प्रतिनिधी डॉ.राजेश पवार, तालुका अधिकारी डॉ. तोरणेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक तापडीया, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मोहीते, डाक विभागाचे शरद शेंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी माहीती देण्यात आली की, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना योग्य पोषण आहार मिळावा याकरीता पाच हजार रुपये अनुदान थेट खात्यात जमा करण्यात येते. पोषण आहारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने मातांच्या आहार मूल्यात सुधारणा होते परिणामी गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य उत्तम होवून सुदृढ बालके जन्मास येतात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात जानेवारी 2017 ते 4 ऑगस्ट २०२१ पर्यंत 40 हजार 994 गर्भवती मातांना 16 कोटी 64 लक्ष 84 हजार रुपये वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील गरोदर व स्तनदा मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.