कोरोना परिस्थितीमुळे यंदाच्या आषाढी वारीच्या सोहळ्यादरम्यान 17 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात कडेकोट बंदोबस्त आणि व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
शंभरकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या आषाढी वारीत कोरोनाविषयक नियम पाळून वारी सोहळा करण्यात येत आहे. राज्य शासनाने परवानगी दिलेल्या दहा प्रमुख पालख्यांतील 40 वारकर्यांनाच आषाढी एकादशीच्या दिवशी परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी चारशेपेक्षा अधिक वारकरी पंढरपुरात नसतील.
ते म्हणाले, आषाढी वारीच्या निमित्ताने 17 जुलैच्या दुपारी दोन वाजल्यापासून ते 25 जुलैच्या दुपारी चार वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असेल. यानिमित्ताने पंढरपूर शहर, भटुंबरे, चिंचोळे भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय चंद्रभागा नदीत स्नान करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
शंभरकर म्हणाले, संचारबंदीच्या काळात कोणतीही खाजगी बस किंवा खाजगी वाहने येणार नाहीत यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात संचारबंदीच्या काळात अत्याआवश्यक सेवा सुरू असणार आहेत. पंढरपुरीताल स्थानिक नागरिकांच्या प्रवासकरीता दिलेल्या वेळेत मुभा देण्यात आली आहे. पंढरपुरातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी शहराबाहेरून वेगळे मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ते म्हणाले, 19 जुलै रोजी वाखरी येथे सर्व मानाच्या दहा पालख्यांचे दुपारी तीनपर्यंत आगमन होईल. वाखरी येथून ईसबावीपर्यंतच्या तीन किलोमीटर पर्यंत 40 वारकर्यांना पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तेथून सर्व पालख्यातील 380 वारकरी आपल्या निर्धारीत बसने पंढरपूरला येतील. तसेच 20 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते व मानाच्या वारकर्यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा होणार आहे. कोरोनाची चाचणी करूनच वारकर्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
आषाढी वारीच्या संचारबंदीत पंढरपूर शहरात एकही व्यक्ती येणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात येत आहे. यासाठी तीन हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
या पालख्या येणार पंढरीत
संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण
संत निवृत्तीमहाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर
चांगावटेश्वर देवस्थान, सासवड
संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड,
संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर,
विठ्ठल रुख्माई संस्थान, कौंडण्यपूर,
संत तुकाराम महाराज संस्थान, देहू,
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांन, आळंदी,
संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर,
संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर