मुंबई : विधानसभेतील गदारोळ प्रकरणी आज भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, अशिष शैलार, नारायण कुचे, पराग अळवणी, शिरीष पिंपळे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया या सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
दुपारी विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना दालनात धक्काबुक्की करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नबाव मलिक यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, विरोधकांनी माईक खेचण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील लांच्छनास्पद घटना घडली आहे. मी ३६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार पाहिला नाही.
सभागृहातील गोंधळानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र बसून तोडगा काढतात. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपचे आमदार गावगुंडांसारखे माझ्या अंगावर आले. अश्लील शिवीगाळ केली. मात्र चुकीच्या पद्धतीने सदस्य वागले. मी कधीही व्यक्तिगत वैरभावाने वागलेलो नाही. आज विधानसभा अध्यक्ष म्हणून लोकशाहीला धरुनच मी माझी भूमिका मांडली. मात्र भाजपच्या सदस्यांचे वर्तन अत्यंत चुकीचे हाेते.
भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये वादावादी झाली, असा खुलासा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांशी चर्चा करुनच पुढील कारवाई करा, असे आवाहनही त्यांनी केली. मात्र गदारोळ करणार्या १२ आमदारांना एक वर्ष निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव अनिल परब यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या कारवाईचा निषेध करत भाजप सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला.
दरम्यान, अधिवेशनात विविध प्रकरणं काढू या भितीनेच आमच्या आमदारांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.