अकोला– राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक प्रक्रिया राबवतांना कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीशी संबंधीत सर्व कर्मचारी, अधिकारी उमेदवार यांचे आवश्यकतेनुसार लसीकरण, चाचण्या करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
जि.प.,पं. स. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त सर्व सूचनांचे वाचन केले व सर्वांना अवगत केले. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, कोविडची खबरदारी निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर घेणे व त्याची माहिती ,त्या त्या वेळी सर्व संबंधितांना देणे आवश्यक आहे. यावेळी जिल्ह्यातील पोटनिवडणूक व्हावयाचे गट,गण, तेथील मतदान केंद्र स्थिती, मतदान यंत्रे, निवडणुकीचे वेळापत्रक, राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश याबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली.
याबैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.