बार्शी : फेसबुक-इन्स्टाग्रामवर असणारा बग बार्शीच्या मयूर फरताडे याने शोधून काढला. मयूरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. बदल्यात कंपनीने त्याला २२ लाखांचे बक्षीस जाहीर केले.
भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला ३० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठविला आहे.
खरं तर, मयूर फरताडे याने त्याच्या कमतरता सांगून अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला वाचविले. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फाॅलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने १५ जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे. बार्शी शहरातील रहिवासी असलेला मयूर हा संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. तो शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. मधुकर फरताडे यांचा पुतण्या आहे.
नवीन शिकायचे म्हणून वेगवेगळ्या सिक्युरिटी रिसोर्सेसचे लिखाण वाचत होतो. त्यातून इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फिचर्स बघून वेब ॲप आणि अँड्रॉइड ॲपवर टेस्ट करीत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुकचा बग bounty प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये त्यामध्ये सिक्युरिटी रिसोर्सेस पार्टीसिपेट करू शकतात. इथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केला