अकोला : लिंकिंग करणे, बियाणे विक्रीच्या पावतीवर शिक्का मारणे अशा विविध प्रकरणात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनियमितता आढळल्याने जिल्ह्यातील ३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. संबंधितांची १४ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाण्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच निविष्ठा विक्री करताना लिंकिंग करणे, सोयाबीन बियाणे विकताना शेतकऱ्यांच्या पावतीवर शिक्का मारण्याचे प्रकरण अशा विविध विषयांमध्ये कृषी सेवा केंद्राच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये कृषी सेवा केंद्रांना नोटीस काढल्या होत्या. संबंधित कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी येथील कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर तेल्हारा येथील एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. यामध्ये पाच कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. यात तेल्हारा तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.
सेवा केंद्र चालकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा, अन्यथा अशी कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.
– डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आतापर्यंत झालेली कारवाई
जिल्ह्यामध्ये कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर आठ केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.