अकोला: जिल्ह्यात दिव्यांगांच्या कोविड लसीकरणास प्रारंभ करण्यात आला असून काल (दि.२०) दिवसभरात चारे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १०२ दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. या संदर्भात पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आरोग्य यंत्रणेस निर्देश दिले होते.
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवार दि.१७ रोजी अकोट येथे आढावा बैठक घेऊन जिल्ह्यात दिव्यांगांच्या कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवा असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दिव्यांगांसाठी लसीकरण राबविण्यास गुरुवार दि.२० पासून सुरुवात केली आहे. आतापर्यंत चार प्राथमिक आरोग्य केंद्रावर १०२ दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. या अंतर्गत सावरा ता. अकोट येथे ३३, मुंडगाव ता. तेल्हारा येथे ३६, कावसा ता. मुर्तिजापूर येथे १९ तर पोपटखेड ता. अकोट येथे १४ या प्रमाणे १०२ दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना सुकर होईल अशाप्रमाणे येणे जाणे व विश्रांतीसाठी व्यवस्था शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आली होती